आमच्याविषयी
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे
जवाहर बाल भवन ही मुलांसाठीची एक शासकिय संस्था आहे, जी १९५२ मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटित झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कल्पनेतून साकारलेले हे केंद्र मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. नृत्य, नाटक, संगीत, शिल्पकला, क्रीडा यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे मुलांचे कौशल्य विकसित करण्याचे कार्य येथे केले जाते. शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने हे केंद्र चालवले जाते.
बालकांच्या मनाला आवडणाऱ्या विविध कलेतून व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, पं. जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून जवाहर बाल भवन या मुक्त अविष्कार केंद्राची स्थापना करण्यात आली. इथे “करून शिका” या तत्त्वावर आधारित उपक्रम राबवले जातात. गेली ७३ वर्षे, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था कार्यरत आहे. २४ मे १९५० रोजी भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान श्री. वल्लभभाई पटेल यांच्या शुभहस्ते बाल भवन इमारतीची कोनशिला रचली गेली. २४ फेब्रुवारी १९५२ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बालभवन इमारतीचे उद्घाटन केले. ६ डिसेंबर १९५२ रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची कन्या इंदिरा समवेत बालभवनला भेट दिली. मुलांना गाणे, नकला करणे, चित्र काढणे, मातीशी खेळणे, नृत्य करणे, मुक्तपणे बागडणे खूप खूप आवडते आणि हेच करण्याची संधी बाल भवन मुलांना देते. ‘Learnig by doing’ हे बाल भवनचे वैशिष्ट्य आहे. ४ ते १६ वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्टे उराशी बाळगून ७३ वर्षे अविरतपणे बालकांसाठी नवनवीन उपक्रम ही संस्था आयोजित करीत आहे. राज्याचे मा. शिक्षण मंत्री हे जवाहर बाल भवन नियामक मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
उद्दिष्टे
कलागुणांना दिशा आणि सर्जनशीलतेला वाट देणारी मूल्ये
- बालक केंद्रबिंदू, त्याच्या व्यक्तिमत्व विकासास प्रोत्साहन
- आवडीनुसार कला-विकास, ज्ञानाचा विस्तार
- स्वनिर्मिती व कलावर्धनासाठी संधी उपलब्ध करून देणे
- चिकित्सक वृत्ती वाढविणे
- सुप्त कलागुणांची जाणीव करून देणे
- सर्जनशीलतेस चालना
